सर्व केंद्रप्रमुख, शाळा संचालक व परीक्षकांसाठी महत्त्वाचे परिपत्रक

प्रिय शिक्षक बंधु-भगिनींनो आपल्या संघटनेच्या परीक्षेचे तसेच परीक्षोत्तर कामकाज सुरळीतपणे पार पाडावे यासाठी आपल्या संपूर्ण सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. आपल्या कामाच्या व्यवस्थितपणामुळे विद्यार्थ्यांच्या निकालात जास्तीत जास्त अचूकता आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यास आपणास ते रुचेल काय ? तद्वत दुसऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांवर अन्याय न होण्याची खबरदारी आपण प्रत्येकाने घ्यायला हवी; नव्हे ती आपली नैतिक जबाबदारी आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून प्रत्येकाने जबाबदार शिक्षकाची भूमिका पार पाडावी अशी आपणास नम्र विनंती आहे. खालील सूचना प्रत्येकाने वाचाव्यात व त्यांचे योग्य पालन करावे.

अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

  • परीक्षा केंद्र प्रमुखांना सूचना
  • शाळा संचालकांना सूचना
  • परीक्षकांना सूचना

अ) परीक्षा केंद्र प्रमुखांना सूचना :

१) आपल्या केंद्रावर प्रश्नोत्तर पत्रिका नेमून दिलेल्या दिवशी येतील. त्यावेळी केंद्रप्रमुख व एक शिपाई यांची उपस्थिती आवश्यक आहे. नंतर प्रश्नोत्तर पत्रिका सुरक्षित जागी ठेवाव्यात.

२) नेमून दिलेल्या दिवशी व वेळी शाळा संचालक प्रश्नोत्तर पत्रिका घेण्यास येतील त्यांना त्यांचे आवश्यक कागदपत्रासह वाटप करावे. त्यांच्याकडून प्रश्नोत्तर पत्रिका मिळाल्याची सही घ्यावी. अधिकार पत्राशिवाय शाळांनी त्यांचा माणूस अथवा शिपाई पाठविल्यास त्याला प्रश्नोत्तर पत्रिका देऊ नयेत.

३) परीक्षा झाल्यानंतर त्याच दिवशी शाळा संचालक उत्तरपत्रिका घेऊन येतील. त्यांना परीक्षेप्रमाणे वेगवेगळे गठ्ठे तयार करण्यास सांगण्यात यावे व त्याचसोबत कार्यालयातर्फे माहितीपत्रकाचा तक्ता असलेली गुणपत्रिका गट्ट्यात ठेवण्यास सांगावे.

४) सर्व परीक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीसाठी देताना सोबत आदर्श उत्तरपत्रिका व बिलासाठीचा कोरा फॉर्मही द्यावा

४) शाळा संचालकांनी परीक्षेच्या दिवशी झालेल्या खर्चाचा अहवाल सादर केल्यावर
खर्च योग्य आहे की नाही ते पाहून तपासावा व त्याच दिवशी तो खर्च देण्यात यावा.

६) अनुपस्थित विद्यार्थ्यांचा तक्ता, परीक्षेच्या दिवशी झालेला खर्च व इतर कागदपत्रे शाळावार लावावी. ती सर्व कागदपत्रे परीक्षा झाल्यापासून एका आठवड्याच्या आत हिशेबासह कार्यालयात जमा करावीत.


७) कार्यालयाकडून उत्तरपत्रिका तपासणीचे कार्यविभाजन शाळेनुसार देण्यात येईल. कार्यालयाकडून उत्तरपत्रिका तपासणीचे कार्यविभाजन दिले नसल्यास शाळांना समप्रमाणात उत्तरपत्रिका तपासणीचे कार्य विभाजन करावे. याबाबतीत कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ देऊ नये.


८) संघटनेच्या परीक्षांना विद्यार्थी पाठविणाऱ्या शाळांतील निम्नस्तर मराठी शिकविणाऱ्या शिक्षकांनाच उत्तरपत्रिका तपासणीसाठी द्याव्यात. (आपल्या परीक्षांशी संबंधित नसणाऱ्या
शालेय शिक्षकांना, व्यक्तीला अथवा अन्य कोणालाही उत्तरपत्रिका देऊ नयेत. )

९) नेमून दिलेल्या शाळांच्या परीक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे हे त्यांना पटवून द्यावे; परंतु अपवादात्मक स्थितीत केंद्र प्रमुखांनी तारतम्यानुसार योग्य निर्णय घ्यावा.


१०) उत्तरपत्रिका तपासून आल्यावर त्यांची व्यवस्थित जमा नोंद तारखेनुसार करावी. परीक्षकांनी सर्व गुणपत्रिका शेरा, माहितीपत्रकासह भरल्या आहेत की नाही ते पाहावे. गुणपत्रिकेत काही अपूर्णता आढळून आल्यास परीक्षकांकडून ते काम करवून घ्यावे.


११) परीक्षकांची उत्तरपत्रिका तपासणीची बिले शाळानुसार लावावी व नंतर ती उत्तरपत्रिकांसह व गुणपत्रिकासह कार्यालयात जमा करावीत.


१२) इयत्ता दहावीच्या ८० गुणांपैकी ७५ व अधिक गुण मिळालेल्या सर्व उत्तरपत्रिका तसेच
संयुक्त मराठीसाठी ४० गुणांपैकी ३५ व अधिक गुण मिळालेल्या उत्तरपत्रिका परीक्षकांना आपणाकडे वेगळ्या करून सुपूर्द करण्यास सांगावे व त्याचे नियमन (Moderation) करुन त्या कार्यालयाकडे स्वतंत्र जमा कराव्यात.


१३) सर्व उत्तरपत्रिका नियमन केलेल्या उत्तरपत्रिकांसह जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कार्यालयात पोहोचत्या कराव्यात जेणेकरून विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे गुण कळतील व प्रमाणपत्र मिळण्यासाठी वेळ लागणार नाही.


१४) परीक्षेच्या दिवशी, अगोदर, नंतर तसेच उत्तरपत्रिकांचे नियमन करताना काहीही अडचण आल्यास त्वरित कार्यालयात दूरध्वनीवर संपर्क साधावा.

परीक्षेसंबंधी माहितीपत्रके नंतर देण्यात येतीलच. आपणांकडून योग्य त्या सहकार्याची अपेक्षा आहे.

ब) शाळा संचालकांना सूचना :


१) शाळेतील परीक्षा संचालक / संचालकांनी नेमून दिलेल्या केंद्रावरून प्रश्नोत्तर पत्रिका ठराविक दिवशी व दिलेल्या वेळेत प्रत्यक्ष घेऊन जाण्याची जबाबदारी शाळा संचालकांची आहे. तसेच परीक्षा झाल्याबरोबर उत्तरपत्रिका त्याच दिवशी केंद्रावर आणून द्याव्यात.

२) ज्या दिवशी प्रश्नोत्तर पत्रिका मिळतील त्या दिवशी सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. परीक्षेच्या दिवशीच नियत पर्यवेक्षकांसमोर वेळेवर सर्व उत्तरपत्रिकांचे गठ्ठे उघडावेत. गट्ट्यावरील स्लिपवर स्वतः सही करावी. तसेच एका पर्यवेक्षकांची सही घेऊन दिनांक व वेळ लिहावी.

३) एका वर्गात किमान ४० किंवा कमाल ५० विद्यार्थी (मिसळून) बसविण्याची जबाबदारी शाळा संचालकांची राहील.
४)शाळा संचालकांनी पर्यवेक्षकाचे (Supervision ) काम करु नये.


५) परीक्षार्थी संख्या दोनशेच्या वर असल्यास दोन शिपाई नेमावे. परीक्षार्थी फॉर्ममध्ये पर्यवेक्षकांची (Supervision) नावे व्यवस्थित लिहावीत व त्यांच्या नावापुढे रक्कम लिहून त्यांची सही घ्यावी.


७) परीक्षा सुरु असताना गैरव्यवहार होणार नाही यासाठी जातीने फेऱ्या मारून लक्ष द्यावे. संस्थेतील पदाधिकारी अचानक भेटीस आल्यावर त्यांना परीक्षास्थळी सर्व माहिती पुरवावी.


८) प्रश्नोत्तर पत्रिकेवर पर्यवेक्षकांना सही करण्यास सांगावे व विद्यार्थ्यांसंबंधी काय सूचना द्याव्यात हे पर्यवेक्षकांना सांगावे.


९) अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका प्रत्येक शाळांच्या वेगळया बांधून त्यावर त्या शाळेचे नांव लिहून गट्ट्यासोबतच बांधाव्यात.


१०) प्रत्येक गट्ट्यात कार्यालयाकडून मिळालेली गुणपत्रिका टाकावी.


११) परीक्षा झाल्याबरोबर ताबडतोब आपल्या सर्व उत्तरपत्रिका घेऊन केंद्र प्रमुखाकडे जावे. आपल्यामुळे इतरांचा खोळंबा होऊ नये हे कटाक्षाने पाहावे.


१२) पर्यवेक्षकांसंबंधीचा फॉर्म, अनुपस्थिती माहितीपत्रक व एकूण खर्चाचे बिल केंद्र प्रमुखांकडे सादर करुन त्या दिवशी झालेला खर्च केंद्र प्रमुखाकडून घ्यावा.


१३) व्यवस्थित न भरलेले फॉर्म्स स्वीकारले जाणार नाहीत.

१४) आपल्या शाळेला तपासण्यासाठी मिळालेल्या उत्तरपत्रिकांचे समान वाटप शाळेतील शिक्षकांना करावे व ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे असे त्यांना पटवून द्यावे.

१५) अमराठी शाळेत मराठी शिकविणाऱ्या व संघटनेच्या परीक्षांसाठी विद्यार्थी पाठविणाऱ्या शाळेतील शिक्षकांनीच उत्तरपत्रिका तपासावयाच्या आहेत. (परीक्षांशी असंबंधित · व्यक्ती, नातेवाईक यांच्याकडून उत्तरपत्रिका तपासणी केली आहे असे आढळून आल्यास शाळेवर कारवाई करण्यात येऊन संपूर्ण शाळेचा निकाल रोखून धरण्यात येईल. )

१६) सर्व परीक्षकांनी योग्य काम केले आहे की नाही याची दखल शाळा संचालकांनी घ्यावी व नियत दिनांकास केंद्रप्रमुखाकडे उत्तरपत्रिका व गुणपत्रिका सादर कराव्यात.

१७) इयत्ता दहावीच्या ८० गुणांपैकी ७५ व अधिक गुणांचे नियमन करण्यात येते, त्यामुळे त्या सर्व उत्तरपत्रिका केंद्रप्रमुखाकडे स्वतंत्ररित्या सुपूर्द कराव्यात.


१८) काहीही अडचण उद्भवल्यास केंद्रप्रमुखांशी अथवा कार्यालयात २४१३९५६०/ ८१०८३२२६९४ या दूरध्वनीवर ताबडतोब संपर्क साधावा.


१९) परीक्षापूर्व व परीक्षोत्तर काम चोख होईल यासंबंधी दक्षता घ्यावी व केंद्रप्रमुखास योग्य सहाय्य करावे ही जबाबदारी शाळा संचालकांची राहील.


क) परीक्षकांना सूचना :
उत्तरपत्रिका तपासण्यासंबंधी सर्वसाधारण सूचना
प्रिय शिक्षक बंधू व भगिनींनो,
आपल्या संघटनेच्या उत्तरपत्रिका तपासणीसंबंधी काही तक्रारी येऊ नयेत म्हणून विद्यार्थ्यांना, त्यांच्या प्रयत्नांना योग्य न्याय मिळावा व आपणा सर्वांना उत्तरपत्रिका तपासणीचे काम अधिक सक्षमपणे करण्यासाठी काही आवश्यक सूचना :
शिक्षकांच्या उत्तरपत्रिका तपासणीसंबंधी :
१) उत्तरपत्रिका नीटपणे तपासल्या जाव्यात.


२) उत्तरपत्रिकांमध्ये प्रश्नानुसार एकत्रित गुण न देता वेगवेगळे गुण द्यावेत. ३) मोठी उत्तरे नीट वाचावीत म्हणजे गुण देताना विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही.


४) वस्तुनिष्ठ प्रश्न तपासताना नीट वाचावेत.


५) व्याकरणात काना, मात्रा शुद्ध लेखनाच्या चुका दुर्लक्षित करु नयेत.

६) निबंध, पत्रलेखन व कथालेखन तपासताना गुण देण्याचे निकष पाळावेत.


७) प्रत्येक प्रश्नाचे एकूण गुण पूर्णांकात करावेत.


८) प्रश्नांच्या गुणांची बेरीज नीटपणे करावी.


९) पहिल्या पानावरील सर्व रकाने नीट भरावेत.
जी शाळा आपल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी बसविते, त्या शाळेतील शिक्षकांना इतर शाळेच्या उत्तरपत्रिका तपासणे अनिवार्य आहे. ‘शाळा संचालकांनी’ ते काम अधिकाधिक कसे चोख होईल हे पाहणे शाळा संचालकांचे किंवा परीक्षा संचालकाचे आहे व खाली दिलेल्या सूचना व्यवस्थितपणे पाळल्या गेल्या आहेत की नाही ते पाहून केंद्र संचालकांकडे नियोजित वेळेत, उत्तरपत्रिका शाळा परीक्षा संचालकांनी आणून द्यायच्या आहेत. यासाठी आपण परीक्षा संचालकांना योग्य सहकार्य करावे.

शाळा परीक्षा संचालकांनी व परीक्षकांनी उत्तरपत्रिका केंद्र संचालकांकडे सुपूर्द करण्याअगोदर खालील गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे.


१) सर्व उत्तरपत्रिका व्यवस्थित तपासल्या आहेत की नाहीत ते पाहावे.


२) आदर्श उत्तरपत्रिका हे ब्रह्मवाक्य नव्हे, शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासताना, आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा वापर जरुर करावा, परंतु आदर्श उत्तरपत्रिकेतील आवश्यक सूचनांचे पालन करावे.


३) प्रश्नानुसार गुण पूर्णांकात करावेत व बेरीज अचूक असावी.


४) प्रत्येक उत्तरपत्रिकेवर आपली सही असणे आवश्यक आहे.

५) उत्तरपत्रिकेवरील गुण गुणपत्रिकेत भरताना काळजीपूर्वक भरावे.

६) गुणपत्रिकेमागील माहितीपत्रक न चुकता भरावे.


७) उत्तरपत्रिका तपासणीचे बिलपत्रक व्यवस्थित भरून केंद्रप्रमुखाकडे पाठवावे.


८) आपल्याला काही शंका असल्यास कार्यालयात अथवा केंद्रसंचालकाशी संपर्क साधावा.

९) उत्तरपत्रिका तपासण्यासंबंधी काही अडचण असल्यास शाळा संचालकांनी त्या उत्तरपत्रिका मुख्य कार्यालयात आणून द्याव्यात, म्हणजे निकालाचे काम लांबणार नाही.


१०) अधिक उत्तरपत्रिका तपासावयाच्या असल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा.

११) उत्तरपत्रिका तपासणीचे मानधन कार्यालयातून उत्तरपत्रिका सुपूर्द केल्यानंतर वीस दिवसांच्या आत घेऊन जावे.


१२) सर्व परीक्षकांनी दि. १७-१-२०२६ पर्यंत उत्तरपत्रिका शाळा संचालकांकडे द्याव्यात.

१३) तपासलेल्या उत्तरपत्रिका परस्पर मुख्य कार्यालयाकडे देऊ नयेत…


१४) शाळा संचालकांनी उत्तरपत्रिका २४-१-२०२६ रोजी केंद्र संचालकांकडे आणून द्याव्यात.

१५) इयत्ता दहावीच्या ८० गुणांच्या उत्तरपत्रिकेत ७५ व अधिक गुण, तसेच ४० गुणांच्या उत्तरपत्रिकेत ३५ व अधिक गुण असणाऱ्या उत्तरपत्रिका नियमनासाठी केंद्र संचालकांकडे स्वतंत्रपणे सादर कराव्यात.


१६) हे परिपत्रक शाळेतील सर्व शिक्षकांना दाखवून यावर त्यांची सही घ्यावी व शाळा संचालकांनी हे परिपत्रक आपल्या फाईलला जपून ठेवावे. आपले काही शिक्षक हे काम अत्यंत चोखपणे करतातच परंतु इतरांनीही आत्मपरीक्षण करावे व कामात अधिकाधिक सहकार्य करावे ही विनंती.