‘महाराष्ट्राची राजभाषा’ ‘मराठी' तिला अभिजात भाषेचा सन्मान मिळाला. अभिजात मराठी भाषेचा सन्मान व गौरवाचा आनंद व्यक्त करताना निम्नस्तर मराठी शिक्षक संघटनेच्या सर्व सभासदांना सार्थ अभिमान वाटतो.
राजभाषेला मानाचे स्थान मिळावे, मराठी भाषा समृध्द व्हावी तिचा सन्मान व्हावा, मराठी भाषेचा दर्जा वाढावा यासाठी शालेय स्तरावर हातभार लावण्याचा संघटनेचा मुख्य हेतू. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी १४ डिसेंबर १९८४ रोजी कै. कुसुमताई आडिवरेकर, कै. फादर अँथोनी डिसोझा, कै. फादर जुझे डिसुझा यांच्या नेतृत्वाखाली निम्नस्तर मराठी शिक्षक संघटनेची स्थापना झाली. तेव्हापासून गेली चाळीस वर्षे संघटना मराठी भाषेसाठी, अमराठी विद्यार्थ्यांसाठी, मराठी भाषा शिक्षकांसाठी कार्यरत आहे. शालेय पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रमाशी संलग्न राजभाषा मराठी साठी शैक्षणिक कार्य करणारी एकमेव शैक्षणिक संस्था आहे.
आज मराठीला "अभिजात मराठीचा" सन्मान मिळाला आहे. त्यासाठी सर्वांचे अभिनंदन करताना बृहन्मुंबई निम्नस्तर मराठी शिक्षक संघटनेला खूप आनंद होत आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा अभिमान सर्वांना आहे. शालेय स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, तिला मानाचे स्थान मिळावे, मराठी भाषा समृध्द व्हावी, तिचा सन्मान व्हावा, मराठी भाषेचा दर्जा वाढावा यासाठी संघटना सातत्याने शैक्षणिक कार्य करीत आहे.
शालेय स्तरावर शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यात मराठी भाषेची गोडी निर्माण करणे, मराठी शुद्ध व प्रभावीपणे लिहिणे, वाचणे व बोलणे याबाबत जागरूकता वाढवणे, आणि मराठी भाषेला समृद्ध व सन्मानित स्थान मिळवून देणे हाच आमचा दृष्टीकोन आहे.
मराठी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आमची संस्था सातत्याने मराठी भाषेच्या प्रसारासाठी कार्यरत आहे. इ. ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा विषयाच्या परीक्षा घेतल्या जातात. पाठ्यपुस्तकातील बदल लक्षात घेऊन अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकांची निर्मिती केली जाते.
मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांच्या मनात प्रेम निर्माण होण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम, स्पर्धा व कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. शाळा आणि कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा प्रभावी वापर होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
संघटना अमराठी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मराठीची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न करते. विद्यार्थी मराठी आत्मविश्वासाने बोलू शकावेत, लेखनात वाचनात प्रगती करावी आणि संवादकौशल्य वाढवावे, यासाठी आम्ही मार्गदर्शनपर उपक्रम आणि स्पर्धा राबवतो. यामध्ये कथा कथन, वक्तृत्व, निबंध लेखन, गीत गायन अशा विविध प्रकारांच्या शालेय व आंतरशालेय स्पर्धांचा समावेश असतो.
महाराष्ट्राची मायभाषा असलेल्या मराठीला भारत सरकारकडून "अभिजात भाषा" म्हणून गौरव मिळाला, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मराठी ही प्राचीन भाषिक परंपरा लाभलेली, ऐतिहासिक, साहित्यिक व सांस्कृतिक वारसा जपणारी भाषा आहे.
अनेक वर्षांच्या प्रयत्नांती, समित्यांचा पाठपुरावा, शिलालेखांचे संदर्भ, साहित्य खजिन्याचे पुरावे आणि जनतेचा सहभाग यामुळेच मराठीला हा दर्जा मिळाला.